Monday, 16 January 2012

तु गेलीस की...

तु गेलीस की...
भाद्रपदाच्या शेवटी
आणि अश्विनाच्या सुरवातीस
होणारा नकोसा ऋतुबदल
अनुभवतो मी प्रत्येकवेळी...
तु गेलीस की

तु गेलीस की..
वाटे बसलोय प्रेक्षागृहात
नुकताच संपलाय प्रयोग
इतका तुझा वियोग
भयाण वाटे..
तु गेलीस की

तु गेलीस की
नकोशी वाटे शांतता
नुकत्याच संपलेल्या
संगीताच्या मैफिली नंतरची
आसुसतात कान
ऐकण्यास आवाज तुझा...
तु गेलीस की..

तु गेलीस की...
जीव होई व्याकुळ
नाही शोकाकुल
परंतु खुष मी नसे
पुनर्भेटीची ओढ असे...
तु गेलीस की.....

No comments:

Post a Comment